बीड — शेतात वैयक्तिक फायद्यासाठी गांजाची लागवड केल्याची माहिती वडवणी पोलीस ठाण्याच्या सपोनि वर्षा व्हगाडे यांना मिळाल्यावरून मारलेल्या छाप्यात साडेपाच लाखाच्या गांजाची झाड जप्त करण्यात आली.
वडवणी पोलीस ठाणे हद्दीतील लोणावळ शिवारात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती वडवणी पोलीस ठाण्याच्या सपोनी वर्षा व्हगाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे लोणावळा शिवारातील गट नंबर 15 मधील आशाबाई औदुंबर शिनगारे यांच्या शेतात पोलिसांनी छापा मारला. यावेळी शेतामध्ये गांजा पिकाची लागवड करण्यात आल्याच निदर्शनास आलं. पोलिसांनी या छाप्यादरम्यान 21 किलो 960 ग्रॅम गांजाची झाड जप्त केली. याची बाजारी किंमत पाच लाख 49 हजार इतकी आहे. याप्रकरणी महिला शेतकऱ्यास पोलिसांनी अटक केली असून कलम 8 सी,20(बी)(2)(सी) एन डी पी एस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, ऋषिकेश शिंदे उप विभाग माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वर्षा व्हेगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम गायकवाड, अशोक क्षीरसागर, विलास खरात, बिभीषण गुंजाळ, आशुतोष नाईकवाडे, हनुमंत कप्पे विश्वजीत मुंडे, सय्यद अमीर, वसंत करे, रामनाथ शिनगारे यांच्या पथकाने केली.




