बीड — अवैध धंद्यांच्या बाबतीत “शितल” भूमिका घेत हप्ते खोरीत “बल”लावत “लाळ टपकवणाऱ्या ठाणे प्रमुखाच्या कारभारामुळे एलसीबी असो की डीवायएसपी यांच्यावर अवैध धंद्यांच्या बाबतीत कारवाई करण्याची वेळ आली आहे. डीवायएसपी पूजा पवार यांनी हवाला रॅकेटवर कारवाई करत 17 लाख रुपयांची रोकड शहर पोलीस ठाणे हद्दीत जप्त केली आहे.ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये पूजा पवार यांनी ही मोठी कारवाई केल्याने शहरात मोठया प्रमाणावर शहर ठाणे प्रमुखाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
बस स्थानकासमोर सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात डी वाय एस पी ना दोन वेळा कारवाई करावी लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने झमझम कॉलनीत कारवाई करून लाखोंचा गुटखा जप्त केला. या तीन कारवाया चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. मात्र तरीही अवैध धंद्यांना आपल्या छत्रछायेत बळ देण्याचं काम शहर पोलीस ठाणे प्रमुखांकडून होत आहे. तर याच ठाणे प्रमुखावर पोलीस अधीक्षकांचा प्रचंड विश्वास तर आहेच शिवाय आशीर्वाद देखील आहेत. असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. बीडमध्ये ठाणे प्रमुखांची खांदेपालट झाली. मात्र शहर पोलीस ठाणे प्रमुखाची खुर्ची यामुळेच बळकट राहिली की काय? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला जात होता. दरम्यान नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना देखील अवैध धंद्यांना आळा घालावा गुन्हेगारी कमी करावी याची उपरती शहर पोलीस ठाणे प्रमुखाला झाली नाही. त्यामुळे आजही राजरोस अवैध धंदे सुरूच आहेत. जर डीवायएसपींनी, स्थानिक गुन्हे शाखेंच्या पथकानेच कारवाया करायच्या अवैध धंद्यांना आळा घालायचा प्रयत्न करायचा तर ठाणे प्रमुख बुजगावण्याचीच भूमिका घेत राहणार का? नुसता अवैध धंद्यांनाच ते आशीर्वाद देणार का ? हप्ते खोरीतच आत्म मग्न राहणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाणे प्रमुखाच्या बुजगावण्या भूमिकेचाच परिपाक म्हणून निवडणुकीच्या रणधुमाळीत हवाला रॅकेट उध्वस्त करण्याची गरज डी वाय एस पी पूजा पवार यांना वाटली.मसरत नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये पैशांचा बाजार भरवून हवाला सुरु असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी त्यांच्या टीम ने छापा मारला असता घरात 17 लाखांची रोकड आढळून आली आहे. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून सध्या शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, एपीआय पुजारी, सचिन आगलावे, मनिषा केदार यांनी केली आहे.

