बीड — शिक्षक भरती घोटाळ्यात झालेल्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्या प्रकरणी बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या भ्रष्ट जोडगोळीचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी या दोघांच्या निलंबनाचे आदेश प्रधान सचिव रणजीसिंह देओल यांनी दिले आहेत.
नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती घोटाळा झाला. त्यानंतर शासनाने चौकशी समिती स्थापन करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले. बीडमध्ये देखील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी या जोड गोळीने शिक्षण विभागात गैरव्यवहाराचा कळस गाठला. शिक्षक भरती प्रकरणात 500 कोटीचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी केला होता. या सदर्भात तक्रार करून सतत त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. दरम्यान विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या समितीमार्फत बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यात आली.समितीने येथील काही संचिका चौकशीसाठी हस्तगत केल्या होत्या. प्राथमिक चौकशीमध्ये भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे उघडकीस आले. गेल्याच म्हणजे ऑक्टोबर मध्ये अहवाल सादर करून निलंबनाची शिफारस करण्यात आली. यावरून नागनाथ शिंदे व भगवान फुलारी या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

