Saturday, December 13, 2025

शरद पवारआणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा

पुणे – आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले.यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी आपल्या स्वीय सहायकाला विचारले कुठे बसायचे आहे, यावर त्यांच्या स्वीय सहायकाने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार हे अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 1 जानेवारी रोजी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याची बातमी यापूर्वीच प्रसारित झालेली आहे.. तर . मला वाटतं की पांडुरंग माझं नक्की

ऐकणार. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, असा दावाही आशाताई यांनी केलेला आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या काही आमदारांनी केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसेल तर विकास कामे होणे कठीण आहे, याची जाणीव झाल्याने आता अजित पवारांकडे चला, असा आग्रह धरला होता. तर नरहरी झिरवाळ यांनीही पवार कुटुंब एकत्र यावे, असा सूर लावला. ते म्हणाले की, हनुमानाची छाती फाडल्यानंतर जसा त्यात राम दिसला होता तशी माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना लोटांगण घालेन.अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल, असे म्हटले आहे.

पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही.

शरद पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे सांगण्यात येते आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles