पाटोदा — तालुक्यातील वैद्यकीन्ही येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नियोजित हॉटेल व्यवसायिक व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.या मारहाणीत सहा जण जखमी असून त्यांना बीडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एचपीसीएल या कंत्राटदाराच्या कंपनीने टोलनाका त्रयस्त व्यक्तीस चालवण्यासाठी दिला आहे .या व्यक्तीने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. दि.29 डिसेंबरच्या सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी टोल नाक्यावर आली. गाडी चालकाचे टोलचे बॅलन्स संपल्याने प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. बॅलन्स करण्यासाठी वेळ लागत होता त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी गाडीचालकास गाडी बाजूला लावण्यास सांगितले.यावरून गाडी चालकाशी टोलनाका चालकासह कर्मचाऱ्यांची शाब्दिक चकमक झाली.हा वाद सोडवण्यासाठी महादेव राजाराम राख, सुरज प्रभाकर बांगर,जयश्री प्रभाकर बांगर, सौरव प्रभाकर बांगर, प्रभाकर पांडुरंग बांगर, योगेश रामराव राख यांनी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने टोलनाका चालकासह कर्मचाऱ्यांनी या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात चारचाकी निघून गेली होती. कर्मचाऱ्यांनी राख आणि बांगर या नियोजित हॉटेल चालकांना बेदम मारहाण केली. मारहाणीत सहा जण जखमी झाले असून त्यांना बीडच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.दरम्यान पोलिसांनी जखमींना भेटून तक्रारी जवाब देण्याबाबत विचारणा केली. मात्र जखमींनी पोलिसांना जबाब दिला नाही. आम्हाला प्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांना भेटायचे आहे, असे जखमींनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .दरम्यान या प्रकरणाला जातीय आणि राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

