माजलगाव — लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोट दुखू लागल्याने तरुणीची तपासणी केली त्यावेळी पीडिता 5 महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.ही घटना मे महिन्यात उघडकीस आली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव सुनील अलजेंडे आहे. पीडित तरुणी ही सुमारे 20 वर्षांची असून, तिची ओळख सुनील अलझेंडे या तरुणाशी झाली होती. दोघांची मैत्री वाढू लागली आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सुरवातीला त्याने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले म्हणून तरुणीने त्याला विरोध केला नाही. मात्र नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला.
मे महिन्यात तरुणीला सतत पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिच्या आई- वडिलांनी तिला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे ऐकून कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं.या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

