केज — विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजीत राडा झाला.कुऱ्हाड, कत्ती, काठ्यांचा वापर मारहाणी साठी केल्यामुळे काही जण जखमी झाले. ही घटना केज तालुक्यातील येवता या ठिकाणी घडली याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केज तालुक्यातील येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते 53 वर्ष यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. “विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस,” असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. “आपण बारीने पाणी घेऊ” असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह
चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

