बीड — जनतेच्या दुःखावर “जॉन्सन” मलम लागेल वेदना कमी होतील अशी अपेक्षा होती मात्र “विवेक “शून्य प्रशासनाने न्याय मागणाऱ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अंत पाहिला. इशारा देऊनही शेवटचा मार्ग म्हणून आत्मदहनाचा मार्ग अवलंबला त्यावेळी मात्र व्यवस्था तुटेपर्यंत पळाल्याचं विदारक करूण चित्र बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायला मिळाल.
केज तालुक्यातील कासारी येथील रामहरी महादेव वायबसे व त्यांचे कुटूंब 15 ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. रामहरी वायबसे यांचे सख्खे भाऊ डॉ. संभाजी वायभसे यांच्याकडून व गुंडांमार्फत अनेकदा मारहाण झाल्याचा आरोप रामहरी वायबसे यांनी केलेला आहे. त्यांच्याविरूध्द कारवाई करावी यासाठी ते सपत्नीक उपोषणाला
बसलेले आहेत. मात्र प्रशासन उपोषणाची कसलीच दखल घेत नसल्याने रामहरी वायबसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कुटूंबासह उपोषणाला बसूनही प्रशासन कसलीच दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या रामहरी वायबसे हे आज सकाळी हातात डिझेलचे कॅन्ड घेऊन उपोषण स्थळापासून थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत धावत सुटले. मला न्याय द्या, जगुन काही उपयोग नाही असे म्हणत ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि मुख्य प्रवेश द्वारावरच त्यांनी कॅन्ड मधील डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.त्याचवेळी त्याठिकाणी उपस्थित पोलीसांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. पतीने डिझेल ओतून घेतल्याचे पाहुन पत्नीने एकच हंबरडा फोडला. यावेळी महिला पोलीसांनी त्यांनाही धीर दिला. दरम्यान या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपोषण स्थळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेटपर्यंत वायबसे डिझेलचे कॅन्ड हातात घेऊन धावत सुटले होते. मात्र एवढे होईपर्यंत तेथील पोलीस कर्मचारी आणि महसुलचे कर्मचारी झोपा काढत होते का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 24 तासात केंव्हाही आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला होता. मग त्यांना रोखले का नाही ? त्यांचे काही बरेवाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण होते ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

