बीड — जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारीची घटना घडली.सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराडला महादेव गीते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याची चर्चा होती.मात्र, असा प्रकार घडला नाही. सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात झटापट झाली. परंतू, सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना वेगळे केले, असा खुलासा कारागृह प्रशासनाने केला आहे. दरम्यान सायंकाळी महादेव गीते याच्यासह चार बंदींना हार्सुल कारागृहात हलवण्यात आले.
बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले हे न्यायालयीन कोठडीत आहेत. याबरोबरच बापु आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते, मुकूंद गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे हे देखील याच कारागृहात आहेत. याबरोबरच बनावट नोटा प्रकरणातील आरोपी अक्षय आठवले हा देखील याच ठिकाणी आहे. सोमवारी सकाळी महादेव गीते व अक्षय आठवले याने मिळून सुदर्शन घुले याला मारहाण केली तसेच वाल्मीक कराडला देखील मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर दुपारी कारागृह प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देत सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडे यांच्यात झटापट झाली परंतु सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याचे कारागृह प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, मुकूंद गिते, राजेश वाघमोडे या चार जणांना हर्सुल कारागृहात हलवण्यात आले आहे.
एकीकडे वाल्मीक कराड व सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे महादेव गीते याच्यासह अन्य चार कैद्यांना छ.संभाजीनगरच्या हार्सुल कारागृहात हलवण्यात आले. त्यांना कारागृहाबाहेर आणण्यात आल्यानंतर उपस्थित काही जणांसमोर त्यांनी आम्हाला वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुन मारहाण होत असून कारागृहातील सीसीटीव्ही चेक करा, अशी मागणी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एकंदरच या सर्व प्रकारामुळे जिल्हा कारागृहाची लक्तर टांगली गेली आहेत.

