बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा आरोप असलेलाअसलेल्या वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.त्यामुळे पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याचे नाव आरोपी म्हणून समोर आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.