मूंबई — राज्यात विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळामध्ये प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढत असून कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद झाल्याची कबुली खुद्द शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
मराठी शाळांचा पट वाढविण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात दोन हजार मराठी शाळा अडचणीत आल्या असून २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अमोल मिटकरी, विक्रम काळे यांनी उपस्थित केला.
राज्यात २०२५मध्ये ६२० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून ७० गावांत ‘ना शाळा ना पाटी-पेन्सिल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे मराठी शाळा वाचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक, विद्यार्थी व संस्थाचालकांनी लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना दोन हजार मराठी शाळा अडचणीत तसेच २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची बाब मंत्री दादा भुसे यांनी आपल्या लेखी उत्तरात फेटाळली. त्याचप्रमाणे मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याचेही स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आल्याची बाब खरी असून पालकांचा कल इंग्रजी माध्यमांत पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत असल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या भागांत २५५ मराठी शाळा बंद पडल्याची कबुली त्यांनी दिली.
शाळांचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न
राज्यात कमी पटाच्या मराठी शाळा सुरू असताना शाळांचा पट वाढविणे व मराठी शाळा टिकवणे यासाठी उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा प्रवेशोत्सव, इयत्ता पिहली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पायमोजे, बूट, निपूण महाराष्ट्र, समग्र शिक्षा अभियान, स्टार्स प्रकल्प, पीएमश्री प्रकल्प, माझी मराठी सुंदर शाळा, नियतकालिक चाचण्या, शिक्षक प्रशिक्षण उपक्रम इ. उपाययोजनांची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.




