मुंबई — विद्यार्थी व पालकांची होणारी फसवणूक आणि शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील २२ बनावट (मान्यता नसलेल्या) विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.
या विद्यापीठांवर कारवाई करण्याच्या वारंवार निर्देशांनंतरही राज्य सरकारांकडून दुर्लक्ष होत असल्याने भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
यूजीसी कायदा, १९५६ नुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेला ‘विद्यापीठ’ म्हणून संबोधण्यासाठी यूजीसीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाईसाठी यूजीसीकडून दरवर्षी ऑक्टोबरमध्ये अशा विद्यापीठांची यादी जाहीर करून राज्य सरकारांना कारवाईचे निर्देश देण्यात येतात.
सर्वाधिक बनावट विद्यापीठे दिल्लीत; महाराष्ट्रातही एकाचा समावेश –
यंदा यूजीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार, सर्वाधिक १० बनावट विद्यापीठे दिल्लीमध्ये आहेत, तर त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये चार, आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन आणि महाराष्ट्र व पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे. मागील पाच वर्षांत दिल्लीतील अशा विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाली असून, उत्तर प्रदेशमध्ये मात्र घट दिसून आली आहे. महाराष्ट्रामध्ये ‘राजा अरेबिक युनिव्हर्सिटी’ हे बनावट विद्यापीठ असल्याचे या यादीत नमूद आहे.
यूजीसीने राज्य सरकारांना या बनावट विद्यापीठांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. अनेक वर्षांपासून ही विद्यापीठे कार्यरत असूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी यूजीसीच्या यादीची तपासणी करून काळजी घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
राज्य व बनावट विद्यापीठाचे नाव खालील प्रमाणे
दिल्ली (१०)
१. एआयपीपीएचएस विद्यापीठ (AIPPHS University)
२. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड (Commercial University Limited)
३. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी (United Nations University)
४. वॉकेशनल युनिव्हर्सिटी (Vocational University)
५. ए.डी.आर.- सेन्ट्रिक जुरीडीकल विद्यापीठ (A.D.R.-Centric Juridical University)
६. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग (Indian Institute of Science & Engineering)
७. विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट (Vishwkarma Open University for Self-Employment)
८. आध्यात्मिक विश्वविद्यायल (Adhyatmik Vishwavidyalaya)
९. डब्ल्यूपीयूएन विद्यापीठ (WPUN University)
१०. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनीअरिंग (Institute of Management & Engineering)
उत्तर प्रदेश (४)
११. गांधी हिंदी विद्यापीठ (Gandhi Hindi Vidyapeeth)
१२. महामाया टेक्निकल विश्वविद्यालय (Mahamaya Technical Vishwavidyalaya)
१३. नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ (Netaji Subhash Chandra Bose Open University)
१४. भारतीय शिक्षा परिषद (Bhartiya Shiksha Parishad)
केरळ (२)
१५. सेंट जॉन युनिव्हर्सिटी (St. John’s University)
१६. इंटरनॅशनल इस्लामिक विद्यापीठ (International Islamic University)
आंध्र प्रदेश (२)
१७. क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी (Christ New Testament Deemed University)
१८. बाईबल ओपन युनिव्हर्सिटी (Bible Open University)
पश्चिम बंगाल (२)
१९. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसिन (Indian Institute of Alternative Medicine)
२०. इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टनेटिव मेडिसिन अॅण्ड रिसर्च (Institute of Alternative Medicine & Research)
महाराष्ट्र (१)
२१. राजा अरेबिक युनिव्हर्सिटी (Raja Arabic University)
पुद्दुचेरी (१)
२२. श्री बोधि अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन (Shri Bodhi Academy of Higher Education)

