धनंजय मुंडे यांनी ढाका कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन
बीड — येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या यश नामक २२ वर्षीय तरुण मुलाची बीड शहरात काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एका टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील ढाका कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
स्वर्गीय यश ढाका या उमद्या तरुणाची बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले होते. अल्पसंख्यांक मागासवर्गीय समाज असलेल्या वाल्मिकी समाजातील देवेंद्र ढाका व त्यांच्या परिवारावर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून, ढाका कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वर्गीय यश ढाका याच्या सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जावी यासाठी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, तुमच्या या लढाईत तुम्ही स्वतःला एकटे समजू नका, कुणालाही घाबरू नका, मी न्यायाच्या या लढाईत तुमच्या पूर्ण शक्तीने पाठीशी उभा आहे असे धनंजय मुंडे यांनी यश ढाका च्या आई वडिलांशी बोलताना म्हटले. यावेळी पत्रकार देवेंद्र ढाका व त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून केल्या जात असलेल्या तपासाची धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची चर्चा करून माहिती घेतली असून याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करणार असून, यशच्या खूणाच्या कटात सहभागी असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, ॲड. गोविंदराव फड, प्रदेश प्रवक्ते भागवत तावरे, अविनाश नाईकवाडे, विनोद हतांगळे, यांच्यासह ढाका कुटुंबीय व नातेवाईक आदी उपस्थित होते.

