गेवराई — पोटच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच दुःख सहन न झाल्याने आईनेही विष पिऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे घडली.
अभिमन्यू भागवत खेत्रे वय- 45 वर्ष व कौशल्या भागवत खेत्रे वय-70 वर्ष रा. वाहेगाव -आमला, ता. गेवराई, जि. बीड असे आत्महत्या केलेल्या माय लेकराचे नाव आहे.सोमवारी सकाळी अभिमन्यू याने घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.आपल्या मुलाने आत्महत्या करुन जीवन संपविल्याने आई कौशल्या खेत्रे यांना दुःख सहन न झाल्याने त्यांनी देखील विष घेतले. आधीच मुलगा गेला त्यातच आईने विष घेतल्याने कुटुंबीयाने कौशल्या खेत्रे यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळीच आई कौशल्या खेत्रे यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.या दोन्ही घटना घडल्यानंतर तलवाडा पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अभिमन्यू खेत्रे याचा मृतदेह शवविच्छेदन जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. तर आई कौशल्या खेत्रे यांच्या मृतदेहाचे बीड जिल्हा रुग्णालयात आज शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

