Sunday, December 14, 2025

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल

बीड — घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवितो,असे विचारल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला टेकडीवर नेले. त्यानंतर बेल्टने मारहाण केली. तोंडवर, नाकावर बुक्यांनी मारहाण केली.हा प्रकार जुलै २०२४ मध्ये घडला होता. या मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला होता. आता नऊ महिन्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन मुंडे, आदित्य गित्ते, सुमित उर्फ बबलू बालाजी गित्ते अशी आरोपींची नावे आहेत. यातीलच सचिन मुंडे, आदित्य गित्ते,आरोपी यांनी शिवराज दिवटे याला अमानुष मारहाण केली होती त्या आरोपीच्या अटकेनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता याही प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मुंडे आणि गित्ते टोळीचे पाय आणखी खोलात गेल्याच दिसत आहे.
परळी तालुक्यामध्ये नंदागौळ गावातील योगीराज अशोक गित्ते (वय ३२) या शेतकऱ्याने नऊ महिन्यानंतर पोलिसांना फिर्याद दिली आहे. आदित्य व सचिन हे अनेकदा घरासमोरुन दुचाकीवरून ये-जा करताना हॉर्न वाजवायचे. एकेदिवशी त्यांची गाडी थांबवुन तुम्ही असे का करता, असे म्हणाल्यावर ‘तुझ्या बापाचा रस्ता आहे काय, आम्ही काही पण करु. तू आमच्या नादी लागू नको नाही तर तुझ्याकडे बघावे लागेल’ असे म्हणून ते निघून गेले. २५ जूलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता योगिराज हे घरी जाताना नंदागौळ ते घाटनांदुर जाणारे रस्त्यावरील पाण्याचे टाकीजवळ आल्यावर आदीत्य गित्ते व सचिन विष्णु मुंडे हे दुचाकीवरून आले.योगिराज यांना अडवून त्यांची कॉलर पकडत दुचाकीवर बसवून विठ्ठल टेकडी येथे नेले. तेथे सुमीत हा होता. तेव्हा सचिन मुंडे व आदित्य गित्ते यांनी ‘तू लई माजलास का आम्हाला रस्त्यात थांबऊन दुचाकीवर रेस का करतो म्हणून विचारतो का’ असे म्हणून दोघांनी शिवीगाळ करुन सचिन मुंडेने बेल्टने तोंडावर, पाठीवर, पायावर आणि हातावर मारहाण करून जखमी केले. पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून योगिराज यांना तेथेच सोडून ते निघून गेले. तक्रार दिली तर ते पुन्हा मारतील, या भितीने उशीर झाल्याचे कारण योगिराज यांनी दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles