जालना — मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच वृत्त समोर आलं होतं जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे.तसेच ब्रेन मॅपिंग, सीबीआय चौकशी, नार्को टेस्ट करायला मी तयार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.
जरांगे पाटलांनी ऑडिओ क्लिप ऐकवली
मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला दोन अटक करण्यात आलेल्या आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली, नंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखी एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी म्हणतो की, साहेब तुम्ही आले का परळीला? धनंजय मुंडे म्हणतात, नाही, अजून पुण्याला आहे, गरबड करू नका. आरोपी विचारतो, गाडीचं काय झालं यावर धनंजय मुंडे म्हणतात की, मी आता नवीन गाडी देऊ शकत नाही, जुनी गाडी देऊ शकतो.
माझ्या अंगावर गाडी घालायची होती
ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर गाडीचं काय प्रकरण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंना ही गाडी आमच्या ताफ्यात द्यायची होती. त्यानंतर ती गाडी आमच्या अंगावर घालायची होती. हा तो प्रकार आहे. ही क्लिप खोटी असं धनंजय मुंडेंचं म्हणणं असेल तर सीडीआर काढण्यात यावा. कोण कुठं होतं, कोण कुणाला भेटलं? जे दोघेजण सध्या अटक आहेत ते कुठे भेटले? त्यावेळेसचे लोकेशन काढा. सगळं समोर येईल, तुमचं आणि माझं वैर नाही. भाषणा पर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझ्या मुळावरचं लोकं उठवले.
मी सगळ्या गोष्टींना तयार
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी सगळ्या गोष्टीला तयार आहे. असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी घातक आहे. त्याच्यावरील संकट टाळण्यासाठी आता ओबीसी ला ओढणार का? अजित दादा असे लोक पाळणार का? अजित दादांना सुद्धा शॉक बसला असेल. फडणवीस साहेबाला आता याचा छडा लावावा लागणार आहे, शिंदे साहेबाला सुद्धा लक्ष घालावं लागणार आहे. मराठा समाजाला सांगतो, मी सगळं व्यवस्थित करतो तुम्ही फक्त शांत रहा, मला तुम्हाला मोठं करू द्या. असा आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
जरांगेंनी धनंजय मुंडे च नाव घेत माजवली होती खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत दावा केला की, मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, हा कट रचण्यासाठी प्रथम खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला.मनोज जरांगे पाटील यांनी या कटात बीड जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याचा किंवा पीएचा समावेश असल्याचा उल्लेख केला, ज्याने काही आरोपींना परळी येथील एका रेस्ट हाऊसमध्ये धनंजय मुंडेंकडे नेले. तिथे ही बैठक भाऊबीजेच्या दिवशी झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. या कथित कटामध्ये एकूण १० ते ११ जणांचा समावेश असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत, या प्रकरणाचा मुळापासून तपास करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तपास यंत्रणांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले होते.

