बीड — राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता. आपण उभे असताना अचानक येत टोळक्याने आपल्याला गंभीर मारहाण केली. आपलाही खून झाला असता मात्र चालक मध्ये आल्याने आपण बचावलो असल्याचा आरोप अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
गेवराईत नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मंगळवारी पवार व पंडित गटांत वाद अचानक उफाळला.यानंतर एका टोळक्याने पंडितांच्या कृष्णाई बंगल्यावर चालून येत या ठिकाणी असलेल्या अमृत डावकर यांना बेल्ट, लाथा आणि दांडक्याने मारहाण केली. यामध्ये डावकर यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाणीच्या जखमांचे व्रण आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरु आहेत.आपल्याला मारहाण करणारे माजी आमदारांचे भाऊ इतर पाच सहा जणांसह पोचले. आलेले सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाचा कट रचूनच आले होते. माजी आमदारांचे बंधू खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतचे लोकही गुंड प्रवृत्तीचे होते.त्यांनी आपले वाहन बाहेर उभा असलेल्या वाहनावर आदळले. हा आवाज ऐकून मी कार्यालया बाहेर आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे घोळक्यातील लोक म्हणत होते. अमरसिंह पंडित येथे नाहीत नेमकं काय घडलं असं शांततेत त्यांना विचारलं मात्र अमरसिंह पंडित इथे नाहीत म्हणून मला संपवून टाकू, असेही हल्लेखोर म्हणत होते असा आरोप अमृत डावकर यांनी केला.
तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुखाच्या खुन प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला व्यक्ती आणि शिक्षा भोगलेला व्यक्ती कारागृहाच्या बाहेर आला तरी त्याचे वर्तन कसे असेल? असे डावकर म्हणाले. आपल्याला बचाव करण्याची संधीही दिली नाही. आपलाही खून झाला असता मात्र, मला मारहाण होत असताना चालक मध्ये आल्याने आपण सुदैवाने बचावलो असल्याचं अमृत डावकर यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितलं. या आरोपानंतर बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

