प्रत्येक गावातील फक्त एकाच गटाला लाभ
बीड — नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. या योजनेअंतर्गत, ग्राम पातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी प्रकल्पाच्या मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत आणि कमाल २४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक- आत्मा, सुभाष साळवे यांनी यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

प्रकल्प गावांमधील उमेद, माविम व आत्मा पुरस्कृत आणि इतर महिला बचत गट तसेच महिलांच्या ग्राम संघटना या उपक्रमासाठी पात्र असतील. लाभ मिळवण्यासाठी, संबंधित गटामध्ये वेगवेगळ्या कुटुंबांतील किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.
प्रत्येक गावातील केवळ एकाच महिला गटाला या योजनेचा लाभ दिला जाईल. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, लाभार्थ्याची निवड सोडत पद्धतीने केली जाईल. जर प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक असेल. निवडक गटांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर-चलित अवजारे, बीबीएफ यंत्रे, लागवड आणि पेरणी यंत्रे, मल्चिंग यंत्रे, कंबाईन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यांसारखी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येईल.
इच्छुक महिला बचत गटांनी ५ एप्रिलपर्यंत प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर https://dbt-ndksp mahapocra.gov.in/
ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावेत.अधिक माहितीसाठी, प्रकल्प गावातील समूह सहाय्यक आणि स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक ‘आत्मा’ सुभाष साळवे यांनी केले आहे.

