Sunday, December 14, 2025

मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या, आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त

मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक शुक्रवारी आझाद मैदानावर धडकणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून आझाद मैदान परिसरात दिड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा देखील शुक्रवारी मुंबईत येणार असल्याने मुंबई पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्या समर्थकांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी रात्री मराठा मुंबईत दाखल होणार आहेत. नवी मुंबईतून गुरूवारी रात्री अटल सेतूवर हा जत्था दाखल होईल तेथून मुक्तमार्गाने (फ्री वे) आझाद मैदानात रवाना होणार आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असे हे आंदोलन होणार असल्याचा दावा करण्यात आल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कंबर कसली आहे.

पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

गणेशोत्सव काळात मुंबई पोलिसांनी २० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात येणार असल्याने तेथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आंदोलन स्थळ आझाद मैदान येथे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात 2 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 6 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 200 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि 1300 पोलीस कर्मचारी आदींचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब स्क्वॉड पथक तैनात करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलन एकत्र येणार असल्याने कुठलेही गालबोट लागू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारचा दिवस पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. गणेशोत्सवातच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारीच मुंबईतील गणेशोत्सव दर्शनासाठी येणार आहेत.

शहा हे मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळ आणि मुंबईतील भाजप नेत्याच्या घरी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. शहा यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलिसांची सत्वपरिक्षा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनापूर्वी लालबाग राजाच्या दर्शनाला जाणार आहे.
पालघर, वसई, मधून हजारोंच्या संख्येने आंदोलक

शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनासाठी मुंबईलगतच्या मिरा भाईंदर, वसई विरार आणि पालघर मधूनही हजारोंच्या संख्येने आंदोलक जाणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आमच्या लोकांना ट्रेनने जाण्याच्या सूचना केल्या आहेत, असे आंदोलक शंकर बने यांनी सांगितले. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असेही बने यांनी सांगितले. दरम्यान, गुरूवार दुपारपासून मुंबईत आंदोलनकर्ते दिसू लागले. आझाद मैदान, नरिमन पॉईंट, फोर्ट परिसरात आंदोलनकर्त्याचे जत्थे फिरताना दिसत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles