जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन पुरावे देणार
जालना — मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा एक गंभीर आणि धक्कादायक कट उघडकीस आला आहे. या कटाच्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.जरांगे यांना जीवे मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बीड येथील एका कार्यकर्त्याने यासंदर्भात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतलेल्यांमध्ये दादा गरुड आणि जरांगेंचाच पूर्वीचा सहकारी अमोल खुणे यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बीड शहरात कट रचण्यासाठी गुप्त बैठका झाल्या होत्या, ज्यात एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव समोर आल्याचे सूत्रांकडून कळते.मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी या कटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचला आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, “हे सत्य आहे. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.” जरांगे पाटलांनी कट रचणाऱ्यांना ‘तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास’ असा इशारा दिला आहे.
ते उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती आणि पुरावे सादर करणार आहेत. जरांगेंच्या या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

