बीड — नगरपालिकेच्या वसुली विभागात काम करणारे अविनाश धांडे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आज सकाळी आढळून आला. ही घटना न.प.च्या इमारतीवर घडल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळच्या सुमारास काही कर्मचारी कामासाठी इमारतीत आले असता त्यांनी छतावर एका शिडीला लटकलेला मृतदेह पाहिला. तात्काळ ही माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद परिसरात मोठी गर्दी झाली. यावेळी पोलिसांनी इमारतीच्या छतावर कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश दिले. अविनाश धांडे हे नगर परिषदेच्या वसुली विभागात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. मात्र त्यांनी आत्महत्या का केली अथवा त्यांची हत्या झाली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेमुळे नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे. अविनाश धांडेच्या घटनेने संपूर्ण बीड शहरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

