बीड –अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन शिक्षकांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आज बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.
या प्रकरणात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज ती कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर बीडमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून हे दोघेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचं समोर येत असल्याने राजकीय वातावरणही तापलं.विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता. घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. या तक्रारीनंतर दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

