बीड — बीड विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बीडची निवडणूक भावाभावातच दुरंगी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे अनिल जगताप यांच्यासह ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला असला तरी लढत संदीप व योगेश क्षीरसागर यांच्यातच होणार आहे.
बीड विधानसभेच्या मैदानात रंगत कोण भरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. विशेषतः माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेवरच सगळी दारोमदार अवलंबून होती. मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होऊन लढत संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातच होणार आहे. शेवटच्या दिवशी अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तरी देखील बीड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात या दोघांशिवाय 29 उमेदवार लुटूपूटूची का होईना लढाई लढणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे अनिल जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्योती मेटे यांनी बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून कायम ठेवले आहेत. आता जयदत्त क्षीरसागर आपली ताकद कोणत्या पुतण्या च्या मागे लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

