बीड — जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश व जुन्या तारखांच्या आधारे
राष्ट्रीय महामार्गाच्या 154 प्रकरणातील लवाद प्रकरणात 241.62 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला. यामध्ये 73.4 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली आहे.याप्रकरणी दहा जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आहेत.तर तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अप्पर जिल्हाधिकारी, तहसलीदार महसूल आणि भूसंपादन कार्यालय बीड कार्यालयास भेटी दिल्या. तसेच जायकवाडी प्रकल्प भूसंपादन आणि उपविभागीय अधिकारी बीड ही कार्यालये तपासली.या दरम्यान काही संचिकांची तपासणी करण्यात आली. भूसंपादन लवाद प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव व पदनाम लिहून वाढीव भूसंपादनाचे आदेश मंजूर केले. त्यावरच्या तारखाही जुन्या होत्या.भ्रमणध्वनी वरील संभाषणातून ही बाब उघडकीस आली.
जुन्या तारखेची 40 प्रकरणे आणखी केले जातील असे उल्लेख असणाऱ्या ध्वनीफिती जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आल्या.1मार्च ते 17 एप्रिल 2025 दरम्याच्या 154 बनावट आदेशाव्दारे 241.62 कोटी रुपयांची वाढीव रक्कम मंजूर असल्याचे कागदपत्र तयार करण्यात आले. या कागदपत्राच्या आधारे छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून 73 कोटी रुपयांचा निधी मिळवून त्याचे वितरण करण्यात आले. 17 एप्रिल रोजी असे 50 बनावट आदेश मंजूर करण्यात आले. त्यादिवशी कोणताही पक्षकार हजर नव्हता. त्यामुळे हा प्रकार संशास्पद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.भूसंपादनातील अधिकारी, कर्मचारी, वकील यांनी संगनमताने हा कोट्यावधीचा घोटाळा केल्याचे दिसून आल्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणात महसूल मधील गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या घोटाळ्यात परळी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे , अविनाश चव्हाण (कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर, भूसंपादन समन्वय कार्यालय), शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी ऑपरेटर भूसंपादन जायकवाडी प्रकल्प कार्यालय) व त्रिबंक पिंगळे (सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड), पांडुरंग पाटील (सहायक महसूल अधिकारी, भूसंपादन समन्वय कार्यालय) राऊत (राष्ट्रीय महामार्ग कार्यालय), ॲड. एस. एम. नन्नवरे, ॲड.नरवडकर,ॲड. पिसूरे, ॲड.प्रवीण राख यांची नावे आहेत.

