बांधकाम मजुरांचे भले जमले नाही “कोनाले”; दमडीच्या कर्मचाऱ्यांनी “नीती” न ठेवता बांधले कोटीचे बंगले ?

बीड — बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कामगार कल्याण अधिकारी यांनी सवयीप्रमाणे (सू) केल्याने धाक “करा”यचाच राहून गेला. हाताखालचा दीड दम डीचा कर्मचारी “नीती”न ठेवता “चव्”हाण(त) कोपरापासून ढोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत पैसा लुटण्याच काम करत आहे. गोरगरिबांची तोंड मारताना कुठलाही अपराधीपणाचा लवलेश देखील चेहऱ्यावर नाही.”कोनाले” च जमलं नाही ते या पठ्ठ्याने केलं. कोट्यावधीचं घबाड बुडाखाली दाबलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत. पण याची फळ कामगारांना कमी आणि कुत्रेच जास्त चाखत असल्याचं बीडमध्ये तरी चित्र आहे. कामगार कल्याण अधिकारी सुधाकर कोणाले यांनी कॉन्ट्रॅक्ट बेस वर कर्मचारीच असा निवडला आहे की कल्याणकारी योजनांचा फायदा बांधकाम मजुरांना होण्याऐवजी एजंटासह समन्वयक असलेल्या नितीन चव्हाणलाच जास्त होत असल्याचं दिसत आहे. दमडीचा पगार मिळत असताना कोट्यावधी रुपयांचे बंगले बांधकाम कामगारांचं शोषण करून उभा करण्याचं काम या पठ्ठ्याने केल असल्याचं उघड झालं आहे. खायला महाग असलेल्या या “महा”भागांने एखाद्या कुबेराला लाजवेल अशी संपत्ती गोळा केली आहे. यांने जमवलेल्या मायेचा स्त्रोत हा गुढ आहे. ही माया गोळा करताना अनेक ग्रामपंचायतींचे बनावट सही शिक्के तयार करून घेतले गेले. या सही शिक्यांचा भरमसाठ वापर करत बनावट कागदपत्र तयार केली. यामध्ये शेकडो लोक बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या योजनांचा बोगस लाभ घेत आहेत.धन दांडग्यांच्या घरात देखील कामगारांना वाटप केलेल्या भांड्याचे किट या माध्यमातून गेले. खरा गरजवंत बांधकाम कामगार मात्र यांच्या या काळ्या कारणाम्यामूळे योजना पासून कोसो दूर राहू लागला आहे. तीच स्थिती सध्या कामगारांच्या सुरू असलेल्या प्रशिक्षणाची आहे. फोटो काढायचं प्रशिक्षण दिले हे दाखवायचं. त्यातून मिळणारं 5 हजार रुपयाच अनुदान खिशात घालायचं. यामध्ये देखील सगळाच बोगस प्रकार सध्या तरी घडत आहे. याच कमाईचा काही भाग कामगार कल्याण अधिकारी सुधाकर कोणाले यांच्यासह राजकीय व्यक्तींना देखील पोहोच होत असल्याने या विरोधात कोणी “ब्र” काढायला देखील तयार नाही. बांधकाम कामगारांशी निगडित हा विषय असल्याने माध्यमही याकडे फारसं लक्ष देत नाही. याच बोगसगिरीचा भांडाफोड गेवराई मध्ये झाला होता. याच्या चौकशीचा ससेमिरा काही जणांच्या पाठीशी लागला आहे. बीडचे हा महानग मात्र महागडा फ्लॅट, ग्रामीण भागात शेती, स्वतःच्या नावावर चार चाकी गाडी घेऊन मजा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. निती “न”सलेला चव्हाण एवढ्या धन दांडग्या बापाचं पोर आहे तर दहा हजार रुपयाच्या दमडीवर काम का करत आहे असा प्रश्न त्यांच्या संपत्तीकडे पाहून पडू लागला आहे. या विरोधात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन कारवाई करणार का? नितीन च्या संपत्तीची चौकशी करणार का? बोगस बांधकाम कामगार शोधून त्यांच्यावर कारवाई करणार का? गोरगरीब बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तरी पदाच्या अधिकाराचा वापर जिल्हाधिकारी करणार का? असेच बांधकाम कामगार उपाशी अन् बोगस पणे फसवणारे तुपाशी यात बदल होणार का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या जनतेतून विचारले जात आहेत.