बीड — लोकसभेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं असताना खासदार बजरंग सोनवणे जिल्ह्यातील जनतेला गिरलेल्या दिलाची प्रचिती देत आहेत. बजरंग बप्पांनी पत्रकारांना शिव्या देण्यापेक्षा मराठा आरक्षण, पिक विमा, पवन ऊर्जा कंपन्यांची शेतकऱ्यावर सुरू असलेली दादागिरी यावर संसदेत आवाज उठवत रान पेटवून संकटमोचक म्हणून “बजरंग” नावाला साजेस काम करावं.अन्याय, अत्याचाराची लंका दहन करा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
एकीकडे लोकसभेच अधिवेशन सुरू असताना त्याला गैरहजर राहत खा.बजरंग सोनवणे यांची गाडी पत्रकारांवरच घसरली त्यांच्या बायको लेकरावर अशोभनीय टिका टिप्पणी केली. पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेताच सल्लेवजा गिरलेल्या दिलाची प्रचिती देत टोमणे वजा दिलगिरी व्यक्त केली.आपल्याला ज्या पदावर जनतेने बसवले आहे.त्या पदाच्या प्रतिष्ठेची धूळधाण केली. ज्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने स्वतःच्या कष्टातून कमावलेला पैसा खर्च करत बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यांच्या आरक्षण मुद्द्याचा विसर बजरंग सोनवणे यांना अधिवेशन काळातच पडला हे समाजाच दुर्दैव आहे. 2020 चा पिक विमा शेतकऱ्यांच नुकसान होऊन देखील न्यायालयीन तसेच रस्त्यावरची आंदोलनाची लढाई लढून देखील अजून मिळालेला नाही. 2024 चा पिक विमा अजूनही मिळण्यासाठी प्रशासनाच्या कुठल्याही हालचाली नाहीत. अनुदानाचा प्रश्न देखील मोठा आहे.
शेतीवर उपजीविका करणारा शेतकरी वर्ग विशिष्ट जातीचा जरी नसला तरी बहुसंख्य मराठा समाज या क्षेत्रात आहे याचा विसर देखील खासदार महोदयांना पडला. पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी सद्बुद्धी त्यांना कधी येणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून देखील विचारला जात आहे. याचबरोबर ज्या बालाघाटाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीत डोक्यावर घेतलं. प्रचंड मताधिक्य दिलं. ज्या मताधिक्याच्या जोरावर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं दुर्दैवाने त्या बालाघाटाचीच सध्या ससेहोलपट होताना दिसून येत आहे. ज्या केंद्र सरकारने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताला महत्व देत मोठमोठ्या प्रकल्पाला मंजूरी दिली. या प्रकल्पामध्ये उतरलेल्या पवन ऊर्जा कंपन्या शेतकरी वर्गालाच कच्चं खाण्याचं काम सध्या करत आहेत. दादागिरी, गुंडगिरी आमिष दाखवत शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला मात्र खासदार महोदयांना वेळ नाही. पवन ऊर्जा कंपन्या पोलीस यंत्रणा हाताशी धरून शेतकऱ्यांच जगण हराम करत आहेत त्या कंपन्या विरोधात मात्र खासदार शब्दही बोलायला आज तयार नाहीत. मंगळवारी पवन ऊर्जा कंपनी व पोलीस यंत्रणेच्या दादागिरीने निर्माण केलेल्या सुलतानीला कंटाळून शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न सुलतानपूर मध्ये केला. तळहाताच्या फोडासारख जपलेल्या पिकाची तार ओढण्यासाठी नासाडी केली जात होती. एवढं घडूनही त्यावरही चकार शब्द बोलायला देखील जिभ जड होऊ लागली आहे. उलट त्या शेतकऱ्यावरच सरकारी कामात अडथळा आणणे, आत्मदहनाचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं सांगत मानसिक अत्याचार करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणे कडून केला गेला. एवढं सगळं घडत असताना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले की त्यांना शिव्या हसडायच्या ही कुठली पदाची प्रतिष्ठा असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे, जाती,मातीचे ज्वलंत प्रश्न संसदेत पेटवून “बजरंग” नावाची बुज राखा अशी मागणी जनतेतून केली जात आहे. तुमच्याकडून पत्रकारांना अजूनही शिव्या दिल्या गेल्या तरी चालतील पण जनतेचे प्रश्न लोकसभेत उठवून रानपेटवत अन्याय अत्याचाराची “लंका” दहन करण्याचं काम आता तरी करा अशी मागणी जनतेतून होत आहे.

