Sunday, December 14, 2025

बनसारोळा उपकेंद्रात अपहार; वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल

केज  — तालुक्यातील बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या इस्थळ उपकेंद्रातील शासकीय निधी १ लाख १६ हजार ६९४ रुपयांचाअपहार केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि आयडीबीआय बँकेच्या शाखा अधिकाऱ्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक शिवाजी गवळी यांच्या फिर्यादीनंतर करण्यात आली.

फिर्यादीनुसार, उपकेंद्र ईस्थळच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून १,१६,६९४ रुपये निधी जून २०२४ मध्ये आयडीबीआय बँक, शाखा बनसारोळा येथील खात्यावर जमा झाला होता. सदर निधी काढण्यासाठी सरपंच आणि अधिकृत सिग्नेटरी यांची संयुक्त सही आवश्यक होती. मात्र आरोग्य सेविका मनिषा पानसरे यांनी या खात्यातील निधी परस्पर काढल्याचे बँक स्टेटमेंटवरून स्पष्ट झाले.

चौकशीदरम्यान असे आढळले की, आरोग्य सेविका पानसरे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाजुद्दीन कमरुद्दीन मोमीन यांच्या सांगण्यावरून व शाखा अधिकाऱ्याच्या संगनमताने बँकेतून रक्कम काढली. बँकेकडूनही याबाबत पुष्टी मिळाली असून पानसरे यांना निधी काढण्याचा कोणताही अधिकार नव्हता, तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे पैसे काढून शासनाची फसवणूक केली असल्याचे तपासादरम्यान सिद्ध झाले आहे. या प्रकारात आरोग्य सेविका मनिषा पानसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाजुद्दीन मोमीन आणि बनसारोळा आयडीबीआय बँक शाखाधिकारी या तिघांनी संगनमताने शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे.

या तिघांविरुद्ध फसवणूक व शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद, बीड यांनीही संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles