बीड — स्वाभिमानाने जगणारा बंजारा समाज आपल्या हक्काचा वाटा मागतोय, आम्ही भिक मागत नाहीत, कोणाचा घेऊन आपलं भलं व्हावं अशी भावना न ठेवता कष्ट करत जगणारा हा समाज आहे. बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण लागू करा, १७ सप्टेंबर पुर्वी एसटी आरक्षणाची घोषणा करा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काळा दिन म्हणून साजरा केला जाईल असा इशारा बंजारा समाज बांधवांनी आजच्या विराट मोर्चातून राज्य सरकारला दिला आहे.
बीडमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी एक नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, आण्णाभाऊ साठे चौक, बसस्टँड समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपारिक वेषभुशेत सहभागी झाला होता. एकच मिशन एसटी आरक्षण अशा घोषणांचे फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एसटी आरक्षणाची आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली. या मोर्चाला जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील युवतींनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी मोर्चात बंजारा समाजाचे धर्मगुरू बापूसिंग महाराज, आ.धनंजय मुंडे, आ. विजयसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, मराठा समन्वयक, गंगाधर काळकुटे, योगश क्षीरसागर यांच्यासह समाज बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाला होता.
धर्मगुरू बाबूसिंग महाराज मोर्चा रॅलीत सहभागी
बंजारा समाजाची कशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी देवी येथील महंत बाबूसिंग महाराज बीड येथील एसटी आरक्षण मोर्चा रॅलीत सहभागी झाले होते.
पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी वेधले लक्ष
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातून दाखल झालेल्या महिला भगिनींना पारंपरिक वेशभूषेत येत आपली मागणीची घोषणा देतांना शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
एकीचे अन् नेकीचे दर्शन
जिल्ह्यातून दाखल झालेल्या बंजारा समाज बांधवांकडून मोर्चा सुरू झाल्यापासून ते समारोप होऊ पर्यंत एकजुट दाखवत शिस्तीत आणि शांतता प्रिय मोर्चा पार पडला. त्यानंतर पोलीस प्रशासनाला सहकार्य करत समारोप करण्यात आला.
भविष्याच्या लढाईसाठी चिमुकल्याच्या हाती फलक
जिल्ह्यातील तांड्यांमधून सर्वच समाजबांधव आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरले होता. यावेळी अनेक मताभगिनीसोबत लहान लेकर मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी अनेक लेकरांचकडून स्वतःच्या भविष्यासाठी सुरू असलेल्या लढाई घोषणेचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाल्याचे दिसले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काळा दिन साजरा करणार
लाखोंच्या संख्येने दाखल झालेले बंजारा बांधव आपल्या न्याय हक्काची मागणी करत आहे. इंग्रज सरकारांपासून ते निजाम सरकारांपर्यंत सर्वांनीच बंजारा समाजाला आदिवासी म्हणून नोंदी केलेले आहेत. इतर सर्व राज्यात बंजारा समाजाला एसी आणि एसटी मध्ये आरक्षण आहे मग महाराष्ट्रातच व्हीजेएनटी आणले कुठून? असा सवाल उपस्थित करत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पहिले आरक्षण बाबत हालचाली न केल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिन काळा दिन म्हणून महाराष्ट्रातील बंजारा समाज साजरा करणार असे मोर्चाला संबोधित करणाऱ्या मुलींनी व्यक्त केली.
यांनी दिला मोर्चात जाहीर पाठींबा
मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या सूचनेवरून मराठा कृती समितीचा जाहिर पाठींबा, धनगर महासंघ, वंजारी महासंघ, आ.धनंजय मुंडे, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर यांनी मोर्चात सहभागी होत जाहिरात पाठिंब्याचे पत्र दिले.
आरडीसी यांनी मोर्चात येऊन स्वीकारले निवेदन
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर मोर्चा ठिकाणी प्रशासनाने येऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मोर्चा ठिकाणी येत मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारावे.
विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी करणार- आ.विजयसिंह पंडित
बंजारा समाजाच्या कुठल्याही लढाईत शिवछत्र परिवार कायम सोबत राहिला आहे. आज लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या न्याय हक्काची लढाईत पंडित कुटुंबीय नेहमी सोबत राहिला आहे. यापुढे सोबत राहत फक्त पाठींबाच देत नसून येणाऱ्या काळात विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे मत गेवराईचे आ.विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले.
रस्त्यावरची अन कायदेशीर लढाईत मी सोबत- आ.धनंजय मुंडे
अनेक वर्षापासूनच्या असलेल्या मागणीला वाचा फुटली आहे. तर राज्यात असलेल्या बंजारा बांधवांना एसी आणि एसटीचा आरक्षण मग आमच्या महाराष्ट्रातीलच बंजारा बांधवांनी काय पाप केले. सरकारने एका समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केले तोच गॅझेट बंजारा समाजाला लागू करून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. माझे नशीब नेहमीच बलत तर आहे मी आज सरकारच्या मंत्रीपदावर नाही म्हणून मला समाजाच्या न्याय मागणीला रस्त्यावरची लढाई लढताना येता आले. समाजाच्या रस्त्यावरच्या आणि कायदेशीर लढाईत मी सोबत राहणार असून सरकारला आरक्षण देण्यासाठी मागणी करणार असे मत आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

