बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी “पोलीस आपल्या बांधावर”ही संकल्पना नेहमीसारखीच तोंडातून निघालेल्या वाफेसारखीच ठरली. शेतीच्या वादातून चौघा जणांना लोखंडी पाईप, रॉड आणि लाठ्या काठ्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना उदंड वडगाव येथे घडली.
संतोष देशमुख हत्याकांडाने राज्य हादरले गेले. त्यानंतर पोलीस दलाचा भार पोलीस अधीक्षक नवनीत कांवत या प्रामाणिक अधिकाऱ्यावर सोपवण्यात आला.ते प्रामाणिक जरी असले तरी पोलीस दलातील अधिकाऱ्यावरचा अतिविश्वास कायदा सुव्यवस्थेला घातक ठरवू लागला आहे. मारहाणीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ संतोष देशमुख प्रकरणानंतर देखील समोर आले. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असले माध्यमामधून याची वाच्यता केली जात असली तरी माध्यमांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण सर्वसामान्यांच्या अंगलट येऊ लागला आहे. नेकनूर सारख्या ठिकाणी तर पोलीस यंत्रणेवरचा विश्वास देखील ठाणे प्रमुखाच्या कार्यशैलीमुळे उडाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पोलीस अधिकाऱ्यांवरच्या दुर्लक्षामूळे आराजकतेला खतपाणी घातले जात आहे. परिणामी “पोलीस आपल्या बांधावर”हा उपक्रम पोलीस अधीक्षकांनी राबवला संवादातून शेतीचे वाद विवाद मिटवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन देखील केले. मात्र जिथे ठाणे प्रमुखानेच विश्वास गमावला तिथे शेतकरी जाणार कसा? यातूनच उदंड वडगाव मध्ये शेतीच्या वादातून रक्त रंजीत थरार घडला गेला. याचा व्हिडिओ समाज माध्यमात सध्या धुमाकूळ घालत आहे.जमिनीची मोजणी चव्हाण कुटुंबीयांनी केली. भावकीतीलच शेजाऱ्याकडे एक एकर शेती जास्तीची असल्याचे यात स्पष्ट झाले. तुम्हीही जमिनीची मोजणी करून आमचं क्षेत्र आम्हाला परत द्या असं सांगितलं गेलं. तोपर्यंत जास्तीचं तुमच्याकडे गेलेल क्षेत्र वहिवाटू नका असही सांगितलं मात्र यातून वाद उफाळला गेला.सात-आठ लोकांच्या गटाने चार जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीसाठी लोखंडी रॉड लाठ्या काठ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. हा वाद पाहून गावातील बरेच जण घटनास्थळी धावून आले. या मारहाणीत एकाच्या कानाजवळ तेरा टाके पडले आहेत. हात मोडल्यामुळे हातात राॅड टाकावे लागल्याच सांगितलं जात आहे. समाधान चव्हाण, मनोज चव्हाण, जीवन चव्हाण आणि सुदाम चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड मधील जीवन ज्योती खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नेकनूर पोलीसात तक्रार देऊन देखील फारसा प्रतिसाद तक्रारदाराला मिळाला नाही. माणसं मरणाच्या दारात पोहोचली तरी पोलिसांना जवाब घ्यायला लवकर वेळ मिळाला नाही. कसंतरी जखमींचा जवाब नोंदवला मात्र एफ आय आर दाखल करून घेत कारवाई करण्यास वेळ मिळाला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

