बीड — बीड विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्यांसह पूल वाहून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन काही गावांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.३०) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी तातडीची कामे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. काही ठिकाणी कामे सुरू असून प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच बीड विधानसभा मतदारसंघाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्या निवेदनानुसार तातडीची रस्ते व पुल दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार डॉ.क्षीरसागर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह बीड, शिरूर कासार तालुक्यातील रस्ते, पुल दुरुस्ती तसेच नवीन रस्त्यांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.मोमीन, वरिष्ठ, कनिष्ठ व शाखा अभियंता उपस्थित होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक झाली. यामध्ये कार्यकारी अभियंता रविंद्र तोंडे, उप कार्यकारी अभियंता चंद्रकांत बोराडे, श्री.हागवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, काही ठिकाणची किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेल्याचेही सांगण्यात आले.
जि.प. बांधकाम विभागाकडे मांडलेले मुद्दे
पाडळी फाटा ते पाडळी रस्ता, तागडगाव-पाडळी दरम्यान सुमारे १.५ किमी रस्ता, काकडहिरा फाटा-गाव रस्ता, पाडळी खालापुरी ग्रा.क्र.१४ चा ३.५ किमी रस्ता, रौंधवस्तीचा पुल, मंझरीतील मुकादम व धसे वस्ती रस्ते, जांभ-शिरापूर गात ग्रा.क्र.१२१ चा रस्ता व काजळे वस्तीचा पुल, तरडगव्हाण -हाजीपूर -गाजीपूर ग्रा.क्र.१० रस्ता व पुल, पाडळी -जाटवड रस्ता व पुल, पाडळी -ढोकवड ग्रा.क्र.१५ रस्ता, हिंगणी खुर्द येथील ग्रा.क्र.५५१ व ४३६ रस्ते, रुद्रापूर -साक्षाळपिंपरी दरम्यान गीतेवस्ती ग्रा.क्र.२ प्रजामा क्र.२८० रस्ता व पुल, तसेच हिंगणी खुर्द, नाळवंडी व जुजगव्हाण येथील पुल आदी कामांचे प्रस्ताव मांडण्यात आले.
सूचना होताच पुल दुरुस्तीला सुरुवात
शिरूर कासार तालुक्यातील येवलवाडी येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून त्याचाही आढावा घेण्यात आला. तसेच, साक्षाळपिंपरी पुलाच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी डॉ.सारिका क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती.
कपिलधारवाडीत संरक्षण भिंत उभारणार
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी कपिलधारवाडी येथे जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. गावात झालेले भूस्खलन लक्षात घेता रस्त्याच्या बाजूने संरक्षण भिंत उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र तोंडे यांना अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले असून तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

