हिंगणी खुर्दच्या पुनर्वसनावर गावकऱ्यांशी केली चर्चा
बीड — जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरले अशा नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत व धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे गुरुवारी (दि.२५) सकाळी ७ वाजता पूरस्थितीची पाहणी करून अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मागील दोन दिवसांपासून पूरग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सविस्तर माहिती अजितदादांकडे सादर केली होती.

त्याअनुषंगाने झालेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी शासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच, हिंगणी खुर्द गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा झाली असून कार्यवाही करण्याचे अजितदादांनी प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी आमदार विक्रम काळे, विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, ज्येष्ठ नेते रमेश आडसकर, युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, बीडचे तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र राऊत, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पालसिंगणकर, सरपंच संतोष तांदळे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकार गंभीरतेने मदत करण्याच्या प्रयत्नात आहे. अद्याप कुणी आले नाही म्हणून गैरसमज करून घेऊ नका. बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही अजितदादा पवार यांनी दिली. पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या आहेत, त्यांना नव्याने योजना करून विहिरी उपलब्ध करून दिल्या जातील. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना थेट आर्थिक मदत व धान्याची व्यवस्था केली जाईल, असेही ते म्हणाले.
बीड मतदारसंघातील पूरग्रस्त भागात दौरा
बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट, हिंगणी खुर्द, चौसाळा (वाढवणा पूल) तसेच शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा, येवलवाडी येथे अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केली. खोकरमोहातील फुटलेल्या तलावाची पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. रायमोहा व येवलवाडी परिसरात रस्त्यात खचलेला पूल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं झालेलं अतोनात नुकसान व वाहून गेलेल्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर दगडवाडी व हिवरसिंगा येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पुढे बीडमध्ये प्रशासनासोबत चर्चा करून अजितदादा पवार यांनी आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली या गावांना भेटी दिल्या.

