
चौसाळा — येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेमध्ये चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून खरीपाच्या पिकासाठी पीक कर्जाची मागणी केलेली आहे. परंतु सध्या खरिपाच्या पिकांची काढणी झाली तरी शेकडो शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळालेले नसून पीक कर्जासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत शेकडो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच बँकेच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी २९ ऑक्टोबर बुधवार रोजी रोजी चौसाळा शाखेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अविनाश उर्फ बाळासाहेब मोरे पाटील यांनी जिल्हाधिकारी बीड, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा बीड, जिल्हा अग्रणी बँक बीड यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
पीक कर्जाची मागणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यात येईल व यावेळी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चौसाळा व क्षेत्रीय कार्यालय बीड यांची राहील असे निवेदन बाळासाहेब मोरे पाटील यांनी दिलेले आहे.
अगोदरच अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात शेतकरी पूर्णपणे खचलेला असून बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना बँकेत वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वायाला जात आहेत. तसेच सध्या पिकांच्या काढणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कामही बुडत आहे. आता तरी बँक प्रशासनाने मनमानी कारभार थांबवून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. म्हणजे किमान त्यांना आता रब्बीच्या पेरणीसाठी तरी हे पीक कर्ज उपयोगी येईल असे प्रसार माध्यमांना प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात अविनाश उर्फ बाळासाहेब मोरे पाटील यांनी सांगितले आहे.

