बीड — जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले असताना पोलिस ही गुन्हेगारीत बरबटले असल्याचे समोर येत आहे. यामुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.बीडमध्ये लॉजवर थांबलेल्या एका सराफा व्यावसायिकाला चक्क पोलीस अधिकाऱ्याने आणि इतर पोलिसांनी लुटले असल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे कामासाठी बीड येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने ते शहातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक शहरातील शिवाजीनगर येथील पोलीस उप निरिक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले. त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि मोबाईल पोलिसांनी जप्त करून सर्व प्रकारचा संपर्क बंद केला.त्यानंतर त्यांच्यावर सतत दबाव टाकत 7 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. मात्र जैन यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी नकार दिल्यावर पोलिसांनी कथितपणे “मेडिकल खर्च” सांगत दुसऱ्या एका स्थानिक व्यापाऱ्याकडून 4 लाख रुपये मागवण्यास भाग पाडले.ही रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष घेतल्याचे सांगितले जाते. इतक्यावरच न थांबता, जैन यांना रात्री उशिरा दुसऱ्या एका लॉजवर नेऊन संपूर्ण रात्र डांबून ठेवण्यात आले. पहाटेच्या सुमारास आरोपींनी उर्वरित 3 लाख रुपये सकाळी 12 वाजेपर्यंत आणण्याचे आदेश देत त्यांना सोडून दिले.या घटनेनंतर जैन यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

