शिरूर (का) महसूल मंडळात झालेल्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई द्या
बीड — अतिवृष्टीमुळे शिरूर (का) तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आ.संदीप क्षीरसागर यांनी नुकसान झालेल्या विविध ठिकाणी पाहणी करत शेतकऱ्यांना सरसकट भरपाईची मागणी केली.

मागील काही दिवसांपासून बीड आणि शिरूर (का) सातत्याने पाऊस पडत असून अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यापैकी शुक्रवारी बीड तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणी शुक्रवारी संदीप क्षीरसागर यांनी जाऊन पाहणी केली होती. आज त्यांनी शिरूर (का) तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हिवरसिंगा येथील कॅनॉल रोड, रोकडेश्वर नगर, बरगवाडी, घुगेवाडी, रौंद वस्ती (खरगवाडी), धनगरवाडी,कस्पटेवस्ती, कैतके वस्ती खालापुरी, भानकवाडी (वरची) या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहावयास मिळाले. असे वाटत होते की ते शेत नसून लहानसं तळं तयार झालंय. कुठे माती वाहून गेल्यामुळे शेत नुसतंच उघडं पडलेलं आहे. कुठे उभं पीक डोळ्यासमोर पाण्याखाली जाऊन नष्ट झालं आहे.
बीड मतदारसंघातील खोकरमोहा ता. शिरूर कासार येथील शेतकरी बांधवाशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, दुखः समजून घेतले. यावेळी मुख्य रस्ता तयार करण्यासाठी मागणी झाली, नदीवारील नविन पुल बांधकाम करणे, बंधारा दुरूस्त करणे, वस्तीवरील रस्त्याचे काम थांबलेले आहे ते पुन्हा सुरू करणे व जायकवाडी क्रं 3 च्या तलावाची दुरूस्ती पाहणी करून लवकरच या बाबतीत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. याठिकाणच्या गावातील झालेल्या शेतकरी बांधवांच्या पीक नुकसानीचे, सार्वजनिक मालमत्तेचे व इतर ठिकाणचे बीड विधानसभेचे आ. संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाकडे बीड आणि शिरूर का तालुक्यातील सर्व महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली.
बीड विधानसभा मतदारसंघात शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन चे पिक अक्षरशः पाण्यात गेले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान पाहणी वेळी प्रत्यक्ष प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना कसलाही विलंब न लावता सरसकट आर्थिक मदत द्यावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
संदीप भैय्या आम्हाला नुकसान भरपाई द्या; शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी मन हेलावून टाकणारे
मागील काही दिवसांपासून बीड तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना त्यांच्या डोळ्यातले पाणी सर्व काही सांगून जात होते. संदीप भैय्या आम्हाला आर्थिक मदत मिळवून द्या, या नुकसानीतून वाचवा असा टाहो फोडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी मन हेलावून टाकणारे होते.

