Home शिक्षण पाकिस्तानातही मिळणार संस्कृतचे धडे; भगवद्गीता ही शिकवणार

पाकिस्तानातही मिळणार संस्कृतचे धडे; भगवद्गीता ही शिकवणार

0
3

इस्लामाबाद — पाकिस्तान फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात संस्कृतचे धडे विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत. संस्कृत भाषेतील महाभारत व भगवद्गीतादेखील विद्यार्थ्यांना शिकवली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी सांगितले आहे. पाकिस्तानात पुढील दहा ते पंधरा वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील, असा विश्वास लाहोर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात प्राध्यापक डॉ. शाहिद राशिद यांचा मोलाचा वाटा आहे. अरबी व फारसी भाषा आत्मसात केल्यानंतर राशिद यांनी संस्कृत भाषेचे अध्ययन सुरू केले. संस्कृत भाषा ही पाकिस्तानशीही संबंधित असून ती फक्त एका धर्माशी संबंधित नसल्याचे राशिद म्हणाले. लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राशिद यांनी सांगितले.
संस्कृतचा पाकिस्तानशी संबंध
हिंदू धर्माशी संबंधित असलेली संस्कृत भाषा अभ्यासासाठी का निवडली? असा प्रश्न राशिद यांना वारंवार विचारला जातो. त्यावर राशिद म्हणाले, “मला असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना विचारतो की संस्कृत भाषा का शिकू नये? संस्कृत भाषेत मोठ्या प्रमाणात लेखन हे सिंधू संस्कृतीच्या वेळी पाकिस्तानात झाले. संस्कृतचे व्याकरणकार पाणिनी यांचा जन्म देखील पाकिस्तानमध्ये झाला. संस्कृत भाषा आमची देखील आहे. ती फक्त एका विशिष्ट धर्माशी संबंधित नाही.” दरम्यान, पाकिस्तानात सुरू झालेला संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम भारत – पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यास देखील मदत करेल, असा विश्वास राशिद यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानात संस्कृत भाषेतील प्राचीन दस्तावेज
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात संस्कृतमधील प्राचीन दस्तावेज असल्याचे लाहोर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी म्हटले आहे. कासमी म्हणाले, “पाकिस्तानमधील पंजाब विद्यापीठात पाम वृक्षाच्या पानावर लिहिलेले संस्कृत भाषेतील दस्तावेज आहेत. १९३० मध्ये संस्कृत अभ्यासक जेसीआर वुलनर यांनी हे दस्तावेज जमा केले होते. त्या दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी विदेशातून अभ्यासक येतात. येथील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे धडे दिल्यास हे चित्र बदलेल. पाकिस्तानात पुढील दहा ते पंधरा वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील.”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here