बीड — शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून पवन चक्की ,सौर ऊर्जा कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी पदाचा वापर करणाऱ्या अविनाश पाठक यांची बदली झाली असून चंद्रपूर जि प चे कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी म्हणून कारभार पाहणार आहेत. शेतकऱ्यांच्या खरवडलेल्या जखमेवर मलम म्हणून ते काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पवनचक्की सौरऊर्जा कंपन्यांनी जिल्ह्यात पाय ठेवल्यानंतर अविनाश पाठक यांनी शेतकरी विरोधी भूमिका घेत आपला कारभार हाकण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या जमिनीवर अक्षरश: कंपन्यांनी दरोडे घातले त्याला अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाच्या अधिकाराचा वापर करून पाठबळ दिलं. परिणामी जिल्ह्यात कंपन्यानी पाळलेले गुंड, त्यांच्या मदतीला पाठकांच्या आदेशामुळे पोलीस यंत्रणेची तगडी फौज शेतकऱ्या विरोधात उतरवली. परिणामी जिल्ह्यात रझाकाराच्या जमान्याची आठवण शेतकऱ्यांना आली. पवन ऊर्जा कंपन्यांना घातलेल्या पायघड्यामुळे अविनाश पाठक जिल्ह्यात वादग्रस्त ठरले. शेवटी त्यांच्या बदलीचे आदेश आज निघाले. अविनाश पाठक यांच्या शेतकरी विरोधी भूमिकेला “सह्याद्री माझा” ने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून परखड भाषेत विरोध केला होता.त्यांच्या जागी चंद्रपूर जि प चे सीईओ विवेक जॉन्सन हे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नवनियुक्त जिल्हाधिकारी तरी शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या जखमांवर विवेकाची फुंकर घालून त्या जखमा बऱ्या करण्यासाठी जॉन्सन मलम म्हणून काम पाहतील अशी अपेक्षा त्राहिमां झालेल्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे.

