केज — विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या पतीसह पत्नीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाघे बाभूळगाव शिवरात शुक्रवारी घडली
वाघेबाभुळगाव शेजारी पवारवाडी गावचे शेतकरी भास्कर विनायक पवार, त्यांची पत्नी अल्का पवार आणि मुलगा ऋषिकेश हे तिघेही त्यांच्या शेतात खुरपणी करत होते. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अल्का पवार या पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत होत्या. अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या. पत्नीला बुडताना पाहून पती भास्कर पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता, पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. ‘मी तुझ्याशिवाय नाही’ याच अविर्भावाने त्यांनी पत्नीला वाचवण्याचा जीवतोड प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावासाठी योग्य आधार न मिळाल्याने, अल्का पवार आणि भास्कर पवार या दोघा पती-पत्नीचाही विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरेवरून केज पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.



