चौसाळा — गेल्या तीन दिवसांपासून मांस वहातूक करणारा कंटेनर क्र एम.एच.13 ए एक्स 4898 नेकनूर पोलीसांनी पकडून चौसाळा चौकीत आणून लावला आहे.या प्रकरणात कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आली तर नाहीच नाही पण पंढरीच्या वारी मार्गात प्रचंड दूर्घंधी पसरल्याने वारकऱ्यांना नाक मूठीत धरुन चालावे लागत आहे.त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरीत्या जनावरांचे मांस घेऊन जाणारा कंटेनर तीन दिवसांपूर्वी नेकनूर पोलिसांनी पकडला. कारवाई करण्यासाठी तो पोलीस चौकीला आणून उभा करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली. ही तीन दिवस झाले तरी गुलदस्त्यातल गुपित बनून राहिली आहे. टेम्पो मात्र जागेवरच उभा आहे. यात असलेलं मांस सडून गाडी भोवती अळ्यांचा खच पडला आहे. परिसरामध्ये जीवघेणी दुर्गंधी पसरली असली तरी कर्तव्यदक्ष ठाणे प्रमुखांने अद्याप कुठलीच कारवाई केली नाही किंवा करावी अशी सद्बुद्धी त्यांना मिळाली नाही. फक्त संत मुक्ताबाई पालखीच्या वारकऱ्यांना फळ वाटप करत कसे वारकऱ्यांचे सेवेकरी आहोत याचा डांगोरा वाजवला गेला. पालखी मार्गावरील मांस विक्री बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्या घोषणेला ठाणे प्रमुखांनी हरताळ तर फासलाचपण टेम्पोमुळे पसरलेली दुर्गंधी वारकऱ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करेल एवढी सारासार विचार विवेक बुद्धी त्यांना आली नाही. या कंटेनर मध्ये मांस नेमके कोणत्या जनावरांचे? ते गोमांस तर नाही ना?, त्या कंटेनर मध्ये हाड असल्याचं सांगितलं जात तरी नेमकी ती कशाची आहेत? हे पाहायची जबाबदारी नेमकी कोणाची? कंटेनर मुळे पसरलेली दुर्गंधी घेत पंढरीच्या दर्शनाला जायचं म्हणजे चौकीचा परिसर ओलांडताना नर्क यातना वारकऱ्यांना सहन करावी लागत आहे. पोलीस चौकी समोरच महाविद्यालयाकडे जाणारा मार्ग आहे. विद्यार्थ्यांसह जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस अधीक्षक साहेब,नेकनूरच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काही कारवाई केली नसेल, मलिदा लाटला असेल तरीही आम्हाला देणंघेणं नाही कमीत कमी महामार्गावरची कंटेनर हटवून दुर्गंधी तरी दूर करावी. पांडुरंग या प्रकरणात कंटेनर हटवण्याची सद्बुद्धी नक्कीच देईल अशी अपेक्षा सर्वसामान्य वारकऱ्यांसह जनतेतून व्यक्त केली जात आहे.नेकनूर पोलीसांची अजब कहाणी,
वारकऱ्यांसाठी लावली चौकीत अत्तरदाणी? असं उपहासाने म्हटलं जाऊ लागला आहे.

