आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
बीड— बीड तालुक्यातील अनेक निराधारांना संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून आधार मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या योजनांच्या रखडलेल्या मंजुरी अखेर झाल्या असून नवीन लाभार्थ्यांची यादी तयार झाली. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय स्तरावर अनेकवेळा पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.
निराधार वयोवृद्ध नागरिक यांना निर्वाहासाठी निधी देणारी श्रावणबाळ योजना तसेच निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, दिर्घ आजार, घटस्फोटीत स्त्रिया इत्यादी दुर्बल घटकांना आर्थिक मदत पुरवणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि अशाप्रकारच्या इतर योजनांच्या समितीची गेल्या अनेक दिवसांपासून बैठक झाली नव्हती, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू या योजनांच्या लाभापासून वंचित होते. बर्याच दिवसांपासून प्रस्ताव आणि अर्ज दाखल करून देखील लोकांंना लाभासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय स्तरावर अनेकवेळा पाठपुरावा करून, बैठका घेऊन संबंधित यंत्रणा व योजना समितीच्या बैठका घेऊन नवीन पात्र लाभार्थी यादीत समाविष्ट करून पात्र आणि गरजूंना लाभ देण्यासाठी निर्देशीत केले होते. यावर आता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत बीड तालुक्यातील ग्रामीण भागातून असलेल्या १२९ व शहरातील ९७ नवीन लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत शहरातील ७६ व ग्रामीण भागातील ११२ पात्र आणि गरजू लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली सदरील योजनांची बैठक होऊन नवीन लाभार्थींचा योजनेच्या यादीत सामावेश केला गेला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वंचित असलेल्या गोरगरीब, निराधार, दुर्बल घटकांना आ.संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीत पडले आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्रुटीपूर्तता करावी असे आवाहनही आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

