Saturday, December 13, 2025

नायब तहसीलदाराच्या दालनात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

केज – पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला तिच्या माहेरच्याकडून मिळालेली जमीन तिच्या पतीने परस्पर बनावट दान-पत्रा आधारे दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावाने केली. तो बनावट फेरफार रद्द करावा.या मागणीसाठी एक परित्यक्ता महिला अनेक वर्षापासून तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात चकरा मारत होती. त्या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती.

सुनावणी संपल्यानंतर संतप्त आणि त्रस्त महिलेने गुरुवारी  दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदारांच्या दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला रोखल्याने अनर्थ टळला.

तालुक्यातील वरपगाव येथील रविंद्र श्रीहरी भोसले यांच्यासोबत दीपा देशमुख यांचा वर्ष १९९० मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना कोमल नावाची मुलगी झाली. तसेच दिपा देशमुख यांची आई रुक्मीण देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मुलगी दिपा देशमुख हिच्या नावाने केली होती.

परंतु काही दिवसानंतर रवींद्र भोसले याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या एका महिलेशी विवाह केला. तिच्यापासून रवींद्र भोसले यास दोन मुली व एक मुलगा ही अपत्ये झाली. त्यामुळे दिपा देशमुख ही तिची मुलगी कोमल देशमुख हिला घेवून पती रवींद्र भोसले यांच्यापासून विभक्त राहत आहे.

या दरम्यान रवींद्र भोसले याने पहिली पत्नी दिपा हिच्या नावाने असलेली गट नंबर ५६/१ व गट नंबर ५७/१ मधील ८१ आर जमीन ही रवींद्र भोसले यांनी बनावट दान-पत्रा आधारे आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून एका बाँड आधारे दुसऱ्या पत्नी पासून झालेला मुलगा उत्तरेश्र्वर भोसले याच्या नावाने महसुली दस्तावेज करून घेतला.

त्यामुळे रवींद्र भोसले यांनी तत्कालीन महसुली अधिकारी यांच्याशी संगनमत करून उत्तरेश्र्वर भोसले यांच्या नावे केलेला फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी दिपा देशमुख या अनेक दिवसापासून तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात चकरा मारत होत्या.

गुरुवारी सदर फेरफार रद्द करण्याच्या संदर्भात केज तहसील कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर दिपा देशमुख यांनी हा फेरफार रद्द का झाला नाही? म्हणून नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनामध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोबत एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तहसील कार्यालयात असलेल्या महिला नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड व महसूल कर्मचाऱ्यांनी परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान साधून त्या महिलेला आत्मदहन करण्यापासून रोखले.

त्यानंतर केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे व सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक सविता निरडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिपा देशमुख या महिलेला आत्मदहन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles