केज — बापाने भरपूर खर्च करून मुलीचे लग्न लावून दिले. दिल्या घरी ती सुखाने संसार करील अशी आस धरली मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी प्रियकरा सोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
ही घटना केज तालुक्यात घडली आहे. 9 मे रोजी केज तालुक्यातील एका मंगल कार्यालयात झालेल्या या विवाह सोहळ्यात तालुक्यातील अनेक मान्यवर नेत्यांनीही हजेरी लावली होती व नव दाम्पत्याला शुभाशीर्वादही दिले होते, मात्र त्यानंतर नवरीने केलेल्या प्रतापाने सर्वांनाच धक्का बसला आहे
शुक्रवारी दुपारी केज तालुक्यातील एका खेड्यातील नववधूचे शुभमंगल झाले. लग्न लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवदाम्पत्यांनी जोडीने देवदर्शनही केले. त्यानंतर रविवारी तिला मुराळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आले. मात्र, त्याच रात्री या नववधूने रात्री नैसर्गिक विधीला जाण्याच्या बहाण्याने भावजयीचा मोबाईल घेतला आणि माहेरच्या गावाशेजारीच असलेल्या प्रियकराशी मोबाईल वरून संपर्क साधला. दरम्यान
उन्हाळ्याचे दिवस असल्याने ती एकटीच घरात झोपली व तिचे इतर सर्व नातेवाईक अंगणात झोपी गेले. सोमवारी पहाटे नवरी मुलगी झोपलेल्या घरातील वीज दिवे बंद असल्याचे तिच्या आईला दिसून आले. त्यामुळे तिने घरात जाऊन पाहिले असता मुलगी आढळून आली नाही नंतर जवळच्या नातेवाईकांकडे सर्वत्र तिचा शोध घेतला असता नववधू कोणाकडेही आढळली नाही. अखेर मुलीच्या भावाने केज पोलिस ठाण्यात नववधू असलेली बहीण हरवल्याची तक्रार सोमवारी दिली. या नववधूने प्रियकरासोबत पळून जाताना सासरच्या मंडळीने लग्नात घातलेले झुंबर, मंगळसूत्र व इतर दागिन्यासह स्वतःचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसह पोबारा केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

