मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे.त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य करत चर्चांना अधिक रंगत आणली आहे.

‘सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, त्यामुळे राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं,’ असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. नेमकं अजित पवार यांना काय सूचवायचं आहे?, असं प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे राजीनामा देणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अजित पवार यांना सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारले जात होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केलं.
‘आरोप सिद्ध झाले किंवा चौकशीत काही निष्पन्न झालं तरच कारवाई केली जाते. आता तुम्ही प्रश्न विचारलात की २०१० मध्ये माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. तेव्हा मी राजीनामा दिला होता. मात्र, तो माझा वैयक्तिक निर्णय होता. माझ्या सद्सत् विवेक बुद्धीला ते योग्य वाटलं,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता धनंजय मुंडे खरंच मंत्रिपदाचा राजीनामा देतील का?, यावर चर्चा सुरू झाली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील का, की पक्ष नेतृत्व यावर निर्णय घेईल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

