सोने चांदी नगदी सह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त
बीड — दिवसाढवळ्या घरफोडीसह दरोडा चोरी खून यासारख्या 20 हून अधिक गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. त्याच्याकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून चोरीचा साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला तसेच यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई झालेला आरोपी संदीप ईश्वर भोसले रा. बेलगाव ता. कर्जत जि.अहिल्यानगर हा गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन फाटा येथील हॉटेलवर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळाली. तात्काळ त्यांनी पोउपनि. श्रीराम खटावकर यांची टीम रवाना केली. या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला असता संदीप भोसले हा जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आला. मात्र पोलिसांचा संशय आल्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ झडप घालत त्याला जेरबंद केले.परंतु संदीप भोसले याला मोटार सायकल वरून घेऊन आलेला भगवान ईश्वर भोसले याने उसाच्या शेताचा आधार घेत पळून जाण्यात यश मिळवले. पकडलेल्या संदीप भोसले ला पोलिसांनी विचारणा केली असता पिंपळनेर, नेकनूर व शिरूर भागात आपला भाऊ भगवान भोसले च्या मदतीने दिवसा घरफोडी केल्याचे कबूल केले. आरोपी संदीप भोसले याच्याकडून चोरून नेलेल्या मुद्देमाला पैकी चार लाख 41 हजार 100 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने व नगदी तसेच गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपये किमतीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. पुढील तपास कामी पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात संदीप भोसले याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत पोलीस उपाधीक्षक सचिन पांडकर, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज जारवाल,पोनि श्रीराम खटावकर, पोह. सोमनाथ गायकवाड अशोक दुबाले बाळू सानप राहुल शिंदे विकास राठोड अंकुश वरपे आश्पाक सय्यद मनोज परजणे विकी सुरवसे नितीन वडमारे सिद्धार्थ मांजरे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगिरी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

