बीड — विधानसभा मतदारसंघातील हिंगणी खु., चौसाळा, वाढवणा पूल, बोरखेड, शिंदेवस्ती पूल (बोरखेड) आदी गावांमधील पूरग्रस्त भागात मंगळवारी (दि. २३) राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पाहणी केली. याच वेळी डॉ.सारिका क्षीरसागर यांनीही बीड व शिरूर कासार तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दाम्पत्याने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती उभी करणे कठीण झाले आहे. या नुकसानीची माहिती डॉ. क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना सादर केली आहे. आज (दि.२४) अजितदादा पवार यांचा दौरा होण्याची शक्यता असून ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. तातडीने मदत जाहीर करण्यासंदर्भात ते निर्णय घेतील, अशी माहिती डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली. त्यांनी पुढे म्हटले की, पूरस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी सरकार हालचाल करत आहे. ऑगस्टमधील नुकसानीसाठी ५६ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला मिळाले आहे. सप्टेंबर मधील पंचनामे पूर्ण होताच मदत दिली जाणार आहे, असेही डॉ.क्षीरसागर म्हणाले.

डॉ.सारिका क्षीरसागर यांची बीड, शिरूर कासार तालुक्यातील गावांमध्ये पाहणी
डॉ.सारिका क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील राजुरी, बहादरपूर, साक्षाळपिंपरी तसेच शिरूर कासार तालुक्यातील कमलेश्वर धानोरा आदी गावांमध्ये नुकसानग्रस्त शेती, रस्त्यांची पाहणी केली. दरम्यान, आज (दि. २४) त्या गात शिरापूर, हाजीपुर, गाजीपूर, आर्वी, फुलसांगवी व मार्कडवाडी या गावांना भेट देणार आहेत.
‘कल्पतरू’चा दांडिया कार्यक्रम पुढे ढकलला
जिल्ह्यातील सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने बीड शहरातील ‘कल्पतरू’ आयोजित ‘नवजलसा दांडिया’ कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम २५ सप्टेंबर रोजी होणार होता. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती सचिव डॉ.सारिका क्षीरसागर यांनी दिली.

