बीड — मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे लोकसभेसह विधानसभेत निघाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांच्या जागी आता छत्रपती संभाजी नगर येथे उपायुक्त पदी असलेले कांवत बीडचा कारभार पाहणार आहेत. हत्या, गुटखा माफिया,वाळू तस्करी, वित्तीय घोटाळे यासारख्या “नव” नीत आव्हानांचा सामना करत कायदा सुव्यवस्थेचे राज्य कावत यांना निर्माण करावे लागणार आहे.
बीड जिल्ह्याची स्थिती बिहार पेक्षा ही वाईट झाली आहे. मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये नंतर येथील कायद्या सूव्यवस्थेची लक्तर लोकसभेसह विधानसभेत देखील टांगली गेली. वाळू तस्करी, खंडणी, हत्या, दरोडे, गुटखा तस्करी, पतसंस्थांच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशावर पडलेले दरोडे ,गोळीबार यासारख्या प्रकरणांनी कळस गाठला आहे. दररोज कायदा सुव्यवस्थेची धिंडवडे निघत असल्याने परिस्थिती चिंताजनक व स्फोटक बनली आहे. जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ प्रकरणानंतर अपयशाचा कलंक घेऊन बाहेर पडलेले नंदकुमार ठाकूर यांच्यानंतर एस पी म्हणून आलेले अविनाश बारगळ देखील गुन्हेगारीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरले. एस पी ची पडछाया समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची अवस्था तर शेळपटासारखी बनली गेली. ही यंत्रणा नेमकी जिल्ह्यात काय करत होती हा प्रश्न वादातीत बनला गेला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हायवा वाळू तस्करीत सहभागी असल्यामुळे पोलीस ठाण्यात लावलेले वाळूचे हायवा देखील राजरोसपणे पसार करण्यात यश मिळाले. कायदा सुव्यवस्था राबवणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली गेली. त्याचाच परिपाक म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व खंडणी प्रकरण उजेडात आल्यानंतर गुन्हेगारीने किती कळस गाठला आहे. हे महाराष्ट्राला कळालं. परिणामी लोकसभा विधानसभेत हा विषय संदीप क्षीरसागर,सुरेश धस, नमिता मुंदडा, विजय राजे पंडित या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत तर खा. बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत लावून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कायदा सुव्यवस्था राबवताना अविनाशी कलंक जिल्ह्याला लावून ते (बार) गळले. बारगळ यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त पदी कार्यरत असलेले आयपीएस नवनीत कांवत हे आले आहेत. 2017 च्या बॅचचे ते तरुण आयपीएस अधिकारी आहेत. सैनिकी शाळेत शिक्षण पूर्ण केल्यामुळे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून कांवत यांची ओळख आहे. त्यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली असून तीन वेळेस आय ई एस, आय आर एस, आयपीएस अशी यूपीएससी उत्तीर्ण झालेले आहेत.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढून डागाळलेली खाकी स्वच्छ करण्यासह कायदा सुव्यवस्थेच राज्य असल्याची खात्री जनतेला पटवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी इच्छा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

