वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सभेत होणार सन्मान
गेवराई — वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या सहकार आणि साखर उद्योगातील मातृ संस्थेकडून राज्यातील साखर कारखान्यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे मुल्यमापन करून सर्वोत्कृष्ट कार्यक्षमते बाबतचे पुरस्कार दिले जातात. सन २०२४-२५ च्या हंगामाकरीता जय भवानी सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते बाबतचा तृतीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. जय भवानी पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असताना त्यांना मिळालेला हा पुरस्कार जय भवानीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरत असून तांत्रिकदृष्ट्या जय भवानीने स्वतःला सिध्द केले असून हा पुरस्कार कारखान्याचे कामगार, कर्मचारी, इंजिनिअर्स, अधिकारी, संचालक मंडळ, सभासद यांना समर्पित असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले आहे. सोमवार, दि.२९ डिसेंबर रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. यामुळे सर्व स्तरातून जय भवानीचे कौतुक होत आहे.
गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या सहकार आणि साखर उद्योगातील मातृ संस्थेकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते बाबतचा तृतीय पुरस्कार जय भवानीला जाहिर झाला आहे. कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात जय भवानीने तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब केला आहे. राज्यातील साखर कारखानदारीतील तांत्रिक कार्यक्षमतेचे मुल्यमापन करून वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून हे मानाचे पुरस्कार दिले जातात. जय भवानीने अलिकडच्या काळात तांत्रिकदृष्ट्या स्वतःला सिध्द केले आहे. गेल्या हंगामात कारखान्याची कामगिरी सरस ठरली आहे, जयभवानीला मागील हंगामात शुन्य टक्के ब्रेकडाऊन, तांत्रिक कारणांसाठी कारखाना बंद राहण्याचे प्रमाण ०.५५% राखण्यात यश आले असून ते अत्यंत उल्लेखनीय आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गाळप क्षमतेच्या वापरामध्ये ५.७८% ची वाढ झाली असून कारखान्याने १०.४१% साखर उतारा मिळविला आहे. साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर केवळ २९.८१% इतका मर्यादित ठेवण्यात कारखान्याला यश आले असल्याची माहिती चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.
चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी कारखान्याने गाळप क्षमता वाढीसह स्वतःला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे देश पातळीवर जय भवानीच्या कामाची दखल घेण्यात आली. सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक ८४.०९% तर रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९५.२६% राखले गेले. प्रायमरी एक्स्ट्रॅक्शन ७३.८५% तर बगॅसची बचत १२.३०% झाली आहे. जय भवानीच्या तांत्रिक कौशल्याची दखल सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी घेतली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या मातृ संस्थेने केलेल्या मुल्यमापनात जय भवानीची कामगिरी सरस ठरल्यामुळे या कारखान्याला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते बाबतचा तृतीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून सोमवार, दि.२९ डिसेंबर रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्काराचे वितरण करून जय भवानीचे कौतुक करण्यात येणार आहे.
जय भवानीच्या यशाबद्दल संस्थापक चेअरमन शिवाजीराव (दादा) पंडित, विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हा.चेअरमन भाऊसाहेब नाटकर, आ. विजयसिंह पंडित, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, संचालक मंडळ, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊसतोडणी मजुर, वाहतुक कंत्राटदार व हितचिंतकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

