बीड — सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारने आणलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांची गळचेपी करणारा आहे.या कायद्यामुळे निष्पाप लोकांना वेठीस धरल्या जाणार असल्याने सदरील कायदा रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली असून बीड येथे मोठे आंदोलन उभारल्या जाणार असून सदरील आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले आहे.
जनसुरक्षा कायद्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी राज्यभर आंदोलन होणार असून काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडी दि.१० रोजी सकाळी ११.३० वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोठे आंदोलन व निदर्शने करणार आहे.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक, डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधीत लोकांना, सरकारच्या विरोधात बोलणा-या सामान्य नागरीकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करुन दडपशाही आणि बळाचा वापर करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी भीती विविध संघटना आणि विरोधकांनी व्यक्त केली असून कार्यकर्ते व सामान्य नागरीकांमध्ये या विधेयका विरोधात प्रचंड तिव्र असंतोष व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सामान्य जनतेच्या प्रश्नावर, शेतकरी, बेरोजगार युवक यांच्या विविध प्रश्नांवर राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटना सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने जन आंदोलन करतात ही न्याय हक्काची आंदोलन दडपून टाकण्यासाठीच जनसुरक्षा कायद्यांचा वापर केला जाणार आहे. सदरील जनसुरक्षा कायद्या विरोधात काँग्रेस सह महाविकास आघाडी एकवटणार असून काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल सोनवणे यांनी केले आहे.

