चौसाळा — पवनचक्की कंपन्यांची गुलामगिरी करताना कर्तव्यदक्षतेचा आव आणून खाकीचा धाक दाखवत शेतकरी ठाण्यात बसवून ठेवले, पत्रकारांनाही दमदाटी केली. त्याच नेकनूर पोलिसांची इज्जत वेशीवर टांगली गेली. चौसाळा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर पोलीस निरीक्षक देविदास गात व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वर्षा शिंदे यांनी छापा मारून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर मटका ,देशी दारू ,हातभट्टी यावर कारवाई कधी होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
पोलीस यंत्रणेचा धाक काय असतो? धमकावलं तरी अनेकांची हवा टाईट कशी होते? कशी केली जाते?कर्तव्यदक्ष पणा कसा असतो? शेतकरी तर सोडाच माध्यम प्रतिनिधी देखील पोलिसांच्या दादागिरी पुढे हतबल होतो. हे चित्र पवनचक्की कंपन्यांच्या माध्यमातून नेकनूर पोलिसांनी निर्माण केलं होतं.जमिनीची मालकी असूनही शेतकरीच कसा परागंदा करता येतो. याचा रजाकारी अनुभव चौसाळ्यातील शेतकऱ्यांना आला. पवनचक्की कंपन्यांना बंदोबस्त देऊन पोलीस यंत्रणेला अधिकृतरित्या कितपत आर्थिक फायदा झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे.पण पवनचक्की कंपन्यांसाठी वर्दीचा धाक दाखवणारी नेकनूर पोलीस किती बरबटलेली आहे याचं उदाहरण आज चौसाळ्यात पाहायला मिळालं. हिंदू देवताचं नाव वापरून चक्क या ठिकाणी वेश्या व्यवसाय तेही चौसाळा चौकीपासून दोनशे फूट अंतरावर याची कूणकूण ठाणे प्रमुखांना लागली नाही. लागली असली तरी हिंदू देवतेच्या नावाला कलंक लागतो आहे याच्याशी त्यांना सोयर सुतक नाही. शेवटी लक्ष्मी दर्शन महत्त्वाचं असतं हे यावरून सिद्ध झालं. 29 एप्रिल रोजी “सह्याद्री माझा” ने “देशी हातभट्टीचा गुटखा,मटक्याचा खटका; ललनांच्या झटक्यात गरिबांचा संसार थोटका”या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. आज पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या आदेशावरून
पोलीस निरीक्षक देविदास गात व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वर्षा शिंदे यांनी “जानकी हॉटेल” मध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारला. सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास जानकी हॉटेलवर डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी हॉटेलचा व्यवस्थापक देखील पोलिसांच्या ताब्यात असून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याच “जानकी हॉटेल“मध्ये पंकज कुमावत यांनी छापा मारून या धंद्याचा भांडाफोड केला होता.
चौसाळा शहरात जि प शाळेच्या आवारात मटका घेतला जातो. बस स्थानका समोर अवैध देशी दारू विक्री केली जाते. शहरात अशी बरीच दुकान आहेत. तीच स्थिती हॉटेल मधून देखील पाहायला मिळते. भरवस्तीत रसायन युक्त ताडी देखील विक्री केली जात आहे यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे
एवढं होऊन देखील मूग गिळून नेकनूर पोलीस ठाणे प्रमुख गप्प आहेत. अशा ठाणे प्रमुखामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या पोलीस यंत्रणेतील सुधारणेला खिळ बसत आहे. या अवैध धंद्यावर देखील बीड पोलिसांनीच कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

