Sunday, February 1, 2026

चोर नेकनूर पोलीस मौसेरे भाई; कोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत लोकांना खाई; नेकनूरच्या बाजारातून 15 किलो चांदी चोरीला

नेकनूर — ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावीं चा कारभार वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी चक्क नेकनूरसह चौसाळ्याचा आठवडी बाजार चोरांना आंदण दिला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सणाच्या ऐन मोक्यावर नेकनूरच्या आठवडी बाजारातून सराफा व्यापाऱ्याची 15 किलो चांदी असलेली पेटीसह 50 हजार रुपयांची रोकड डल्ला मारून चोर घेऊन गेला. व्यापाऱ्यावर जवळपास 35 लाख रुपयाची संक्रांत आली.विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सकाळी दहाच्या सुमारास घडल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांच्या कृपेने या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. मोबाईल चोरीला गेला, खिसा कापला गेला, महिलांच्या गळ्यातील दागिने गेले तर पोलीस ठाण्यात तक्रारदाराचीच होणाऱ्या उलट तपासणीमूळे नव्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे तक्रारी ही करायला कुणी धजावत नाही तपास व्हायचा तर विषयच येत नाही अशा चोर पोलिसांच्या अडकित्यात जनता मात्र भरडली जात असताना एसपी मात्र कायदा सुव्यवस्थेची घडी बसवल्याचा ढोल कशाच्या जीवावर वाजवत आहेत. असा प्रश्न विचारला जात आहे.
नेकनूर चा आठवडी बाजार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या तो चोरांचा बाजार बनलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मोबाईल चोर, खिसे कापू यांना सुगीचे दिवस आले आहेत. जी स्थिती नेकनुर ची ‌ तीच चौसाळा बाजार ची. विशेष म्हणजे अशा तक्रारी घेऊन ‌ कागदं काळे करायला पोलिसांना वेळ नाही. एखादी मोठी घटना चोरीची अथवा अन्य गुन्ह्यांची घडलीच तर नेकनूर पोलीस ठाण्याला तक्रार द्यायची. पुन्हा दखल घेतली नाही म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सयाजी शिंदेंचा डाळिंबाचा बाग चोरीला गेला. त्याकरता तक्रारदाराला एसपींची भेट घ्यावी लागली. एस पीं नी गुन्हे दाखल करा असे आदेश देण्या ऐवजी विनंतीच्या सुरात चंद्रकांत गोसावींना घ्या तक्रार असं सांगितलं. त्यानंतरही तक्रारीची दखल घेतली नव्हती. माध्यमांनी बोंब ठोकली त्यावेळी कसातरी गुन्हा नोंद केला. तीच स्थिती जोगवा मागून खाणाऱ्या घारगावच्या अंजना बन यांची झाली. देवळात झोपायचं नाही म्हणून एकाने मारहाण केली नाकातली मोरणी चोरली.आजींनी रीतसर तक्रार दिली. एसपींना आत्मदहनाचा इशारा दिला. तरीही दखल घेतली गेली नाही. शेवटी या प्रकरणात देखील माध्यमांना ओरड करण्याची वेळ आली. ओरड होताच तात्काळ कारवाई झाली. आजीला न्याय मिळाला. नेकनूर बस स्थानक, बँक, शिक्षक कॉलनीत चोरीच्या अनेक घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये देखील काहीच झालं नाही. अनेक शेतकऱ्यांचा दारात ठेवलेला सोयाबीन सारखा माल चोरांनी रात्रीच भरून नेला. त्यातही तक्रार देऊनही पुढे काहीच झालं नाही. पोलिसांना चोर सापडलेच नाही. सापडतील कसे तपास झालाच नाही. ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना तो करावासा वाटला नाही. आपण तर एसपी चे लाडके म्हणून खाकी वर्दीची इज्जत त्यांनी ठेवली नाही. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी तक्रारदाराने ठाण्याला येण्याची गरज नाही. क्यू आर कोड स्कॅन करा तक्रार दाखल करा असा आधुनिकतेचा मंत्र जनतेला दिला. याचाही ढोल नगारा माध्यमांनी जोरात वाजवला. पण जिथे प्रत्यक्षात तक्रार देऊन काही होत नाही. तिथे क्यू आर कोड ची दखल कोण घेणार? असा प्रश्न जनतेला का पडू नये अशी स्थिती सध्याची तरी आहे.
नेकनूर पोलीस आठवडी बाजारात येणाऱ्या वाहनांना अडवून निधी संकलन करतात. चौसाळ्यात तर “खास” नेकनूर मधून माणूस रिक्षावाल्यांकडून वसुली करण्यासाठी पाठवला जातो.बाजारात चोर चुपचाप खिसे कापून, महिलांचे दागिने लंपास करून, मोबाईल चोरून पोलिसांच्या नाकावर टिच्चून निघून जातात. वसुली पुढे पोलिसांना होणाऱ्या चोऱ्यांशी काहीच देणे घेणे नाही. तक्रार घेऊन एखादा ठाण्यात आलाच तर दाप दडप करून कसा पिटाळून लावायचा‌ त्याचीच उलट तपासणी कशी घ्यायची यामध्ये नेकनूर पोलिसांचा हात कोणीच धरू शकणार नाही अशी स्थिती आहे. आज नेकनूरच्या आठवडी बाजारात पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर बबन पांडुरंग कानडे नावाच्या सराफा व्यापाऱ्याची 35 लाख रुपये किमतीची 15 किलो चांदी असलेली पेटी चोरांनी पळवली. नुसती पेटीच पळवली नाही तर 50 हजार रुपयांची रोकड देखील लंपास केली. संक्रांतीचा बाजार असल्यामुळे व्यापाऱ्यावर देखील सकाळी दहाच्या सुमारास चोरांची संक्रांत आली. चोरांचा दुपारपर्यंत शोध सुरू होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात तरी पोलीस अधीक्षक सराफा व्यापाऱ्याला न्याय देऊ शकतील का? चंद्रकांत गोसावींच्या कारभाराला आळा घालू शकतील का? गोसावी लाडके आहेत म्हणून पुन्हा त्यांना पाठीशी घातलं जाणार का? यासारखे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles