माजलगाव — शहरातील अंगणवाडीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलेला शिक्षक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून चार दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. दरम्यान उद्या माजलगाव शहर बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार आहे.
माजलगाव मधील एका शाळेच्या आवारात भरणाऱ्या अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडित चिमुकली घटना घडल्यानंतर आजारी पडली तिला दवाखान्यात नेले असता उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली होती. त्यांनी याची कल्पना पालकांना दिल्यानंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. ज्याने हे नीच कृत्य केले आहे त्याला ओळखत असल्याचे तिने सांगितले. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडित चिमुकलीला फोटो दाखवल्यानंतर तिने आरोपीस ओळखले. दरम्यान पोलिसांनी फरार आरोपी राहुल वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.अहील्यानगर)याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य जनतेत रोष व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी माजलगाव शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी कडकडीत बंद पाळून शहर पोलीस ठाणे व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

